75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

crime

Pune Crime News : हनी ट्रॅप टोळीमध्ये पुणे शहर पोलीस दलातील पीएसआय असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काशिनाथ मारुती उभे असं या 55 वर्षांच्या पीएसआयचं नाव आहे.

Pune Crime News : हनी ट्रॅप टोळीमध्ये पुणे शहर पोलीस दलातील पीएसआय असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काशिनाथ मारुती उभे असं या 55 वर्षांच्या पीएसआयचं नाव आहे. त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळीतील महिलांना अटक केल्याची चाहूल लागताच उभे याने पळ काढला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

जेष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या बहाण्याने ओळख वाढवून हनीट्रॅपमध्ये फकसवल्याचा प्रकार समोर आलाय. धक्कादायक म्हणजे या प्रकाराचा मास्टरमाईंड आहे विश्रामबाग पोलीस ठाण्याचा पीएसआय काशीनाथ उभे. विश्रामबाग पोलिसांनी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून टोळीतील तीन महिलांना 1 ऑगस्टला अटक केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यातील एका महिलेवर कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात डॉक्टरला 50 लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले, टोळीने अशाप्रकारे आणखी काही जणांना जाळ्यात खेचून लुटल्याचा संशय आहे. बदनामीच्या भीतीपोटी त्यांनी तक्रारी दिल्या नसल्याची माहिती आहे. याप्रकरणी 64 वर्षीय नागरिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, विश्रामबाग पोलिसांनी तीन महिला आणि एका पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

फिर्यादी ज्येष्ठ नागरिक एका खासगी कंपनीतून निवृत्त आहेत. एका आरोपी महिलेने त्यांच्याशी ओळख करून घेतल्यानंतर आजारी असल्याचे सांगत उपचारासाठी दोनदा पैसे मागून घेतले होते. ते परत देण्याच्या बहाण्याने सोमवारी दुपारी अलका टॉकीज चौकातील एका लॉजवर बोलावून घेतले. थोड्या वेळ गप्पा मारल्यानंतर रूममध्ये दोन महिला आणि एक पुरुष घुसले. त्यांनी महिला हक्क संरक्षण समितीच्या सदस्या, तर पुरुषाने पोलिस असल्याचे सांगत या जेष्ठ नागरिकाला चापटी मारण्यास सुरुवात केली आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

तेव्हा सोबत असलेल्या महिलेनेदेखील कांगावा केला. यानंतर ज्येष्ठ नागरिकाकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. तडजोडीअंती तीन लाख द्यायचे ठरले. या टोळीने ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातील 20 हजार रु. काढून घेतले. तसंच एटीएममधील 60 हजार काढण्यासाठी त्यांना कारमध्ये कोंबून कर्वे पुतळ्याजवळ नेले. तेथे एका सराफा दुकानात अंगठी विकायला लावली. मात्र, दुकानदाराने बदल्यात सोने घ्यावे लागेल असे सांगितल्याने तो डाव फसला. यानंतर ज्येष्ठ नागरिकाला एटीएम सेंटरमध्ये पाठवले. परंतु त्याने चुकीचा पिन टाकल्याने पैसे निघाले नाहीत, यामुळे त्यांना मारहाण करत घरातून चेक आणून देण्यास दम दिला. तिथून संधी साधत ज्येष्ठ नागरिकाने पुढील चौकातून रिक्षा पकडत पळ काढला.

पोलीस अधिकाऱ्यांनेच या हनीट्रॅपच रॅकेट चालवणं म्हणजे रक्षकच भक्षक बनत असल्याचा प्रकार आहे. सुदैवाने पोलीस असूनही विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. हा पीएसआय मात्र सध्या फरार आहे.

Crime
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...