राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गुरुवारी धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी भाजपाचा राजीनामा दिला, समोर आलेल्या माहितीनुसार धैर्यशील मोहिते पाटील हे येत्या 14 एप्रिलला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांना माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातले नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली असून त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातला प्रवेश निश्चित झालाय. येत्या 14 एप्रिलला अकलूजमध्ये ते पक्षप्रवेश करणार आहेत, तर 16 एप्रिलला ते माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करतील. भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते, त्यामुळे आता भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत होणार आहे.
माढा लोकसभा मतदार संघात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून मोहिते पाटील गटाने मागणी केली होती. मात्र भाजपने याकडे दुर्लक्ष करून विद्यमान खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. भाजपने माढा मतदारसंघात रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली, मात्र या उमेदवारीवरून अकलूजचे मोहिते पाटील कुटुंब नाराज झालं.
2019 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यातून रणजीत सिंह निंबाळकर यांना एक लाखाचे मताधिक्य दिले होते, त्यामुळे माढा मतदार संघात मोहिते पाटील यांच्या मनातीलच खासदार हा दिल्लीत जातो असा इतिहास आहे, मात्र यंदा मोहिते पाटलांची नाराजी पत्करून भाजपने निंबाळकर यांना उमेदवारी दिली. 2019 लोकसभेला माळशिरस विधानसभा मतदार संघातून खासदार निंबाळकर यांना एक लाखापेक्षा अधिक मते मिळाली, यामुळे निंबाळकर विजयी झाले. यानंतर मतदार संघात विकास कामाचं श्रेय घेण्यावरून खासदार निंबाळकर आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाले, त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून मोहिते पाटील गटाने निवडणुकीची तयारी सुरू केली होती.